महाराष्ट्रातील समर्थ संप्रदायाचे संस्थापक म्हणजे नारायण सूर्याजी ठोसर संपूर्ण जगाला समर्थ रामदास म्हणून परिचित आहेत. मराठवाडा प्रदेशातील जालना जिल्ह्यातील जांब येथे चैत्र शुद्ध नवमी शके १५३० (२४ मार्च १६०८) रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारार्थ जनजागृतीचे, जनप्रबोधन, आणि जनसंघटनेचे महान कार्य केले. परकीय आक्रमक देश, देव आणि धर्मावर हल्ला करत असताना समर्थ रामदास लोकमनात लढण्याची प्रेरणा प्रज्वलित करण्याचे प्रयास करत होते. अद्वैत तत्त्वज्ञान, साहित्य आणि काव्यनिर्मिती, संघटन या सर्वांतून जनप्रबोधनाचे कार्य रामदासांनी केले. दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, भीमरुपी स्तोत्र इत्यादी सदासर्वकाळ वाचनीय, अनुकरणीय आणि बोधप्रद अशा साहित्याची निर्मिती त्यांनी केली. आज जगभरात त्यांच्या साहित्यावर अभ्यास केला जातो. मारूती ही शक्तीची देवता असल्याने मारूतीच्या मंदिराच्या परिसरात तरुणांना संघटित करत आणि व्यायामाची प्रेरणा देत. यासाठी त्यांनी अकरा मारुतींची स्थापन केली. समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनाही स्वराज्यस्थापनेसाठी वेगवेगळ्या पद्धतीने भरीव मदत केल्याचे संदर्भ आढळतात.
धुळ्याचे श्री. शंकरराव देव यांनी सुमारे ८० वर्षांपूर्वी रामदासांचे जन्मस्थान निश्चित करुन त्याठिकाणी देवालय बांधले. तरी देखील श्रीसमर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव जांब समर्थ, ता. घनसावंगी, जि. जालना हे अधिकतम रामदास भक्तांकडून पूर्णतया दुर्लक्षित राहिलेले होते. हे उपेक्षित गाव श्री. रामदासस्वामी यांची कर्मभूमी चाफळ, शिवथरघळ आणि सज्जनगड या प्रकारे रामदासभक्तांचे तीर्थक्षेत्र व्हावे यादृष्टीने प्रयत्न म्हणून काही कार्यकर्ते गेली ८-१० वर्षे कामास लागलेले आहेत. श्री रामदासांच्या शिकवणीनुसार “उत्कट भव्य तेची घ्यावे मिळमिळीत अवघेचि टाकावे ।।’’ या आदेशानुसार जांब येथे तक्षशीला, नालंदा या धर्तीचे मोठे विद्यापीठ उभे करण्याची संकल्पना पुढे आली आणि त्यावर कामाचा प्रारंभ झाला.
चैतन्य ज्ञानपीठ याचे सर्वसाधारण कल्पना चित्र डोळयासमोर होते ते खूपच भव्य दिव्य होते. चैतन्य ज्ञानपीठ ही कल्पनाच अशक्यप्राय वाटावी अशी होती व आजही आहे. त्यामुळे त्यासाठी आखलेली योजना ही देखील अशक्यप्राय अशीच वाटेल. परंतु गेल्या ६ वर्षातील प्रगती पाहता हे काम नजीकच्या ५-७ वर्षात निश्चित होईल असा विश्वास वाटतो.
चैतन्य ज्ञानपीठ पुण्यासारख्या शहराजवळ करावे अशी व्यवहारिक सूचना पुढे आलेली होती. परंतु बैठकीचे अंती हे ज्ञानपीठ श्री जांब समर्थ येथेच व्हावे हे सर्वानुमते मान्य झाले. कारण मूळ उद्देश श्री रामदासस्वामी यांचे जन्मगाव जांब हे जागतिक प्रेरणा केंद्र करायचे असा निर्धार होता. विशेष म्हणजे जालन्याचे डॉ. श्री. भारत कुलकर्णी ( अध्यक्ष श्री समर्थ मंदिर जांब) यांनी यासाठी ३० ते ४० एकर जमीन उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. शासनाने भारताच्या स्वातंत्र्य लढयाच्या ‘क्रांतीदिनी’ म्हणजे ९ ऑगस्ट २०१२ रोजी ही संस्था पंजीकृत केली.
संस्था पंजीकृत होताच श्री रामदासस्वामींच्या शिकवणीनुसार सामर्थ्य आहे चळवळीचे ‘‘जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे।।’’ ही शिकवण डोळमासमोर ठेवून या चैतन्य ज्ञानपीठास भगवंताचे अधिष्ठान हवे म्हणून विजयादशमी दि. २४ ऑक्टोबर २०१२ या दिवशी श्री क्षेत्र जांब येथील श्री रामदासस्वामी यांच्या मूर्ती समोर तेरा कोटी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र लिखीत स्वरूपात तुमच्या पायाशी आणून देऊ असा संकल्प केला. संकल्प करते वेळी तेरा कोटी म्हणजे किती? असा विचार केलेला नव्हता, नंतर केला. दहा हजार वेळा एक व्यक्ती लिहील अशी तेरा हजार माणसे लिहीतील तेव्हा १३ कोटी होणार असे गणित केल्यावर हे काम फारच अवघड आहे अशक्य आहे असे वाटू लागले. परंतु श्री रामदास स्वामींनी म्हटले आहे.
आणि खरेच प्रचिती आली. दोन वर्षात १३ कोटी जपाच्या लिखीत वह्या झाल्या व ५-६ लाख रूपये जमा झाले. प्रिंटींग बील देऊन झाले. भगवंताचे अधिष्ठान मिळाले, परंतु उपासनेची गरज आहे हे लक्षात आले. म्हणून १०८ कोटी मौखिक जप करण्याचा संकल्प सोडला व २०१५ च्या चार्तुमासात तोही जवळ जवळ पूर्ण झाला.
चैतन्य ज्ञानपीठाचे आतापर्यंतचे उपक्रम
-
श्रीरामचंद्र दर्शन चतुःशताब्दी
-
संकल्पदिन
-
समर्थ महासंगम कार्यक्रम
-
चैतन्य साधना अंक
-
चक्री दासबोध पारायण
-
आत्माराम पुस्तक निर्मिती
आगामी उपक्रम
-
चैतन्य ज्ञानपीठ जांब येथील जागेवर बांधकाम पूर्ण करणे.
-
आरोग्य शिबीरांचे आयोजन
-
श्रीरामनवमी, श्रीदासनवमी, श्री हनुमानजयंती, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे
-
श्री क्षेत्र जांब येथे दर 2 महिन्यांनी श्री दासबोध ग्रंथाचे पारायण सोहळा
-
चैतन्य ज्ञानपीठ जिल्हा मंडळे तयार करणे.
-
संशोधन पत्रिका तयार करून घेणे.
-
वैचारिक संमेलने आयोजित करणे
-
संशोधन केंद्र सुरू करणे.
-
स्वयंपूर्ण खेड्याच्या आधारे विकसित जीवन मॉडेल प्रस्थापित करणे
-
दासनवमीला भव्य महासंमेलन भरविणे.